डोनाल्ड ट्रंप अध्यक्षपदाची सूत्रं २० जानेवारीला हातात घेणार आहेत. त्यांनी जागतिक प्रश्नांवर केलेल्या त्यांच्या एक्सपर्ट कमेंट्सविषयी इतर देशांकडून आतापर्यंत फारशा अधिकृत प्रतिक्रिया येत नव्हत्या पण आता जसा शपथविधी सोहळा जवळ येत चाललाय तशी जगभर ट्रम्प यांच्या विधानांची अधिकृतरीत्या दखल घेतली जातेय आणि त्याला उत्तरही दिलं जातंय.

चीनने आता ट्रम्पविरोधात शड्डू ठोकलाय. तैवानवर चीन सांगत असलेल्या हक्काबाबतीत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. चीनची भूमिका कायम आहे आणि ‘वन चायना पाॅलिसी’चाच पुरस्कार चीन करत राहील असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं.

चीनची ‘वन चायना पाॅलिसी’ म्हणडे अतिशय अस्पष्ट धोरण आहे. या तथाकथित धोरणाच्या आड राहत चीनकडून आसपासच्या देशांच्या ताब्यात असणाऱ्या भूप्रदेशांवर तसंच समुद्रसीमांवर हक्क सांगितला जातो. मग भारतामधल्या अरूणाचल प्रदेश किंवा सिक्कीमचा मुद्दा असो वा दक्षिण चिनी समुद्रातली चीनची दादागिरी असो. हा आमचाच भाग आहे असं सांगत चीन आपलं म्हणणं पुढे रेटत असतो. हा भूभाग किंवा समुद्र तुमचा कसा असं जर चीनला विचारला तर हजारो वर्षांपूर्वींचे अस्पष्ट दाखले देत ‘हा चिनी संस्कृती असलेलाच प्रदेश आहे’ असा विचित्र दावा चीनकडून केला जातो. भारताच्या अरूणाचल प्रदेश राज्यालाही चीनचं सरकार ‘दक्षिण तिबेट’ म्हणतं

तैवानवरही चीनही गेली कित्येक दशकं आपला असा हक्क असल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे तैवानवर थेट लष्करी कारवाई करणं चीनला शक्य होत नसलं तरी तैवानविषयीची अमेरिकेची भूमिका गेली कित्येक दशकं थंड बस्त्याचीच आहे. वन चायना पाॅलिसीला अमेरिकेचा दबल्या आवाजात पाठिंबा आहे.

आपल्या अनपेक्षित वागण्याने सगळ्यांनाच कोड्यात टाकणाऱ्या डाॅनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची कित्येक दशकांची ही राजकीय भूमिका काल अचानक बदलून टाकली.

”सगळ्यावर वाटाघाटी होऊ शकतात. अगदी ‘वन चायना पाॅलिसी’वरसुध्दा” असं विधान डाॅनल्ड ट्रम्प यांनी काल केलं. त्यांच्या या विधानाची चिनी राजकीय वर्तुळात गंभीर दखल घेती गेली. आणि चिनी परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्याने आज ही तिखट प्रतिक्रिया दिली.

डाॅनल्ड ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आल्यावर त्यांना जगभरातून अभिनंदनाचे फोन आले होते. त्यात तैवानच्या राष्ट्रप्रमुखांचाही फोन आला होता. अमेरिकेचं इतक्या वर्षांचं परराष्ट्र धोरण पाहिलं तर हा फोन ट्रम्प यांनी घ्यायला नको होता. पण सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत त्यांनी तैवानच्या प्रमुखांशी बोलणे केलं आणि याचे राजकीय संकेत जगभर पोचले.

२० जानेवारीनंतर काय होणार याची कल्पना आता कदाचित फक्त ट्रम्पनाच असेल!