चीनची गणित अध्यापन पद्धती आता ब्रिटनमधील ८ हजार प्राथमिक शाळांमध्ये वापरली जाणार आहे त्यासाठी ५४.३ दशलक्ष डॉलर्सचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. चीनमधील शांघायचे काही विद्यार्थी २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय मूल्यमापन कार्यक्रमात वरच्या श्रेणीत आले होते. चीनमध्ये ब्रिटनपेक्षा चीनचे विद्यार्थी गणिती क्षमतात तीन वर्षांनी पुढे आहेत, असे चायना डेलीने म्हटले आहे. त्यानंतर ब्रिटनचे विद्यार्थी २६ वे आले होते. ब्रिटनने शांघायमधील १२० शिक्षक आणून त्यांच्या गणित अध्यापनाचा लाभ ब्रिटनच्या विद्यार्थ्यांना दिला. ब्रिटिश माध्यमांनीही त्याला शांघाय मॅथ्स असे नाव दिले. गणित सल्लागार समितीच्या बैठकीत ब्रिटनचे शालेय मंत्री निक गिब यांनी असे सांगितले होते की, ब्रिटनमध्ये शांघाय पद्धतीची गणित अध्यापन शैली उपयुक्त ठरली आहे. या देशात त्यामुळे गणित शिकवण्यात मोठी प्रगती झाली आहे. जगातील चांगल्या कल्पनांमुळे आमच्या शालेय विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. शांघाय नॉर्मल युनिव्हर्सिटीचे ल्यू जिक्सिन हे ब्रिटन-चीन गणित कार्यक्रमाचे समन्वयक असून त्यांनी सांगितले की, ब्रिटनच्या धोरणात नुसती चीनच्या गणित अध्यापनाची नक्कल केलेली नाही. त्याऐवजी गणित अध्यापनाचा एकूणच दर्जा सुधारण्याचा विचार केला आहे. आंतरराष्ट्रीय चाचण्यांचा वाढता प्रभाव पाहता ब्रिटनचे विद्यार्थी त्या स्पर्धात्मकतेत टिकले पाहिजेत हा यामागचा हेतू आहे असे त्यांचे म्हणणे आहे. टीकाकारांच्या मते या गणित कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना गणितातील मूलभूत संकल्पना समजणार नाहीत केवळ उजळणी व घोकंपट्टी केली जाईल. नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन द टीचिंग ऑफ मॅथेमॅटिक्स या संस्थेचे संचालक शार्ली स्ट्रिप यांनी सांगितले की, गणितात प्रावीण्य म्हणजे केवळ उजळणी किंवा घोकंपट्टी नव्हे. विद्यार्थ्यांना गणित विषयाचे आकलन झाले पाहिजे. केवळ पाढे व आकडय़ांचे खेळ पाठ केल्यासारखे शिकणे म्हणजे गणित नव्हे. त्याचा फायदा होतो हे खरे असले तरी सगळे गणित त्यावर आधारित नाही. त्यासाठी संकल्पना स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. केवळ वरवर गणित शिकवण्याने पाया पक्का होत नाही असे त्यांनी सांगितले.