NSG अर्थात आण्विक पुरवठा संघात भारताचा सहभाग व्हायला नको, ही चीनची भूमिका कायम आहे असे चीनचे परराष्ट्र प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे. त्यामुळे या सदस्यत्त्वावरून चीनला होणारा भारताचा विरोध अधिक प्रखर झाल्याचे दिसते आहे. भारताने अण्वस्त्र प्रसार बंदी करारांवर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. या करारावर स्वाक्षऱ्या न केलेल्या देशांच्या गटांबाबत आमची भूमिका कायम आहे त्यात कोणताही बदल चुकूनही होणार नाही असेही शुआंग यांनी स्पष्ट केले आहे. सध्या एनएजीचे अधिवेशन बर्नमध्ये सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलताना शुआंग यांनी भारताला विरोध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे.

मागील वर्षी एनएसजीचे पूर्णवेळ अधिवेशन सियोलमध्ये झाले होते. त्याहीवेळी चीनने ४८ सदस्यीय एनएसजीमध्ये भारताचा सहभाग करुन घेण्यास सक्त विरोध केला होता. बर्नमध्ये सुरू असणाऱ्या अधिवेशनात सहभाग होऊ शकतो अशी आशा भारताला आहे. मात्र आज चीनने भारताच्या सदस्यत्त्वावर पुन्हा आक्षेपच घेतला आहे. जागतिक स्तरावर आण्विक व्यापाराचे नियंत्रण हे एनएसजीमार्फत करण्यात येते. या समूहातल्या ४८ सदस्यांच्या सर्वसंमतीने निर्णय घेतले जातात, असेही शुआंग यांनी म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या एनएसजी सदस्यत्त्वाबाबत, भारताच्या प्रवेशाबाबत चीनला विचारणा केली होती, त्यानंतर भारताच्या सदस्यत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र चीनने शुक्रवारी पुन्हा एकदा भारताच्या सदस्यत्त्वाला विरोधच केला आहे. एनएसजीच्या सदस्यत्त्वाबाबतचे निकष स्पष्ट आहेत. नव्या सदस्यांना सहभागी करुन घेण्यासाठी ज्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आहेत, त्यावर चर्चा होऊ शकते, मात्र चर्चे अंती सदस्यत्त्व दिले जाईलच असे नाही, हेदेखील चीनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे याही वेळी चीन भारताच्या एनएसजी सदस्यत्त्वाला विरोध दर्शवतोय आणि तो लवकर मावळणारही नाही, असेच म्हणावे लागेल.