चीनने अरुणाचल प्रदेशच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा दादागिरी दाखवत भारतातून चीनमध्ये जाणा-या तरुणांच्या शिष्टमंडळात अरुणाचल प्रदेशच्या तरुणांचा समावेश करण्यास विरोध दर्शवला आहे. चीनच्या या दादागिरी विरोधात भारतानेही सडेतोड प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली असून भारतातील तरुणांचा चीन दौराच रद्द करण्याचा विचार भारत सरकार करत आहे. संरक्षण राज्यमंत्री आणि केंद्रीय क्रीडा व युवा खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना पत्र पाठवून चीन अपमानास्पद अटी घालणार असेल तर नाराजी व्यक्त करुन यंदाचा ‘युथ एक्सचेंज’ कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी केली आहे.
भारतातून दरवर्षी तरुणांचे एक शिष्टमंडळ चीनमध्ये जाते. यूथ एक्सचेंज या कार्यक्रमासाठी हे शिष्टमंडळ जाते. चीनच्या दुतावासाने केंद्रीय युवक खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात यूथ एक्सचेंजसाठी पाठवल्या जाणा-या शिष्टमंडळात अरुणाचल प्रदेशच्या तरुणांचा समावेश करु नये अशी स्पष्ट सूचना चीनच्या दुतावासाने दिली आहे. या पत्रावर जितेंद्र सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेश हे भारताचे घटक राज्य आहे. या राज्यात राहणा-या भारतीयांना पाठवू नका अशी अट घालण्याचा अधिकार चीनला नाही. सशर्त आमंत्रण पाठवून भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करण्याचा चीनचा डाव हाणून पाडला पाहिजे. ‘युथ एक्सचेंज’ कार्यक्रमांतर्गत भारतातल्या कोणकोणत्या भागातील तरुणांना देशाचे प्रतिनिधी म्हणून चीन दौ-यावर पाठवायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार भारताला आहे, चीनला नाही; अशी भूमिका जितेंद्र सिंह यांनी घेतली आहे. शिष्टमंडळात अरुणाचल प्रदेशमधील तरुणांचाही समावेश करावा अन्यथा हा दौराच रद्द करावा’ असे पत्रक सिंह यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे मंत्री सलमा खुर्शीद यांना पाठवले आहे. परराष्ट्र खात्याने अद्याप यावर निर्णय घेतला नाही. चीनच्या या कृतीच्या निषेधार्थ हा दौराच रद्द करण्याचा विचार सुरु असल्याचे परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले.