अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना करायचा असेल तर चीनला आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवावी लागेल असा सल्ला चीनच्या राष्ट्रीय दैनिकाने दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनबाबतच्या धोरणाची चीनी माध्यमांनी चांगलीच धास्ती घेतलेली दिसत आहे. त्यामुळेच की काय चीनने आपली लष्करी शक्ती वाढवावी असे ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे.

चीनने आपली रणनीती आखावी, धोरणात्मक अण्वस्त्रांची संख्या वाढवावी, डीएफ-४१ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र तैनात करुन ठेवावे असे म्हटले आहे. आपले हितसंबंध जपण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही स्तराला जाऊ शकतात आणि चीनला कोंडित पकडू शकतात म्हणून आपण तयार राहायला हवे असे म्हटले आहे.


चीनने २०१७ मध्ये आपले संरक्षणाचे बजेट देखील वाढवले पाहिजे असे ग्लोबल टाइमने म्हटले आहे. हे वृत्तपत्र चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र नाही परंतु चीनच्या साम्यवादी सरकारसोबत या वृत्तपत्राचे चांगले संबंध आहे.
आपल्या प्रचारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा शत्रू म्हणून चीनची वेळोवेळी संभावना केली आहे. चीन हा अमेरिकेला कोंडीत पकडू पाहतो असे त्यांनी नेहमीच म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून चीनला धोका असल्याचे ग्लोबल टाइमने म्हटले आहे.

असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर जाऊन देशाचे संरक्षण करण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे. जपान किंवा दक्षिण कोरियाचा सहकारी म्हणून त्यांच्या सीमा सांभाळण्याची आपली इच्छा नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
या लेखात ट्रम्प यांच्या मागील ट्विट्सचा आधार देण्यात आला आहे. ट्रम्प यांनी राजकीय शिष्टाचार मोडून तैवानच्या राष्ट्रपतींशी बातचीत केली त्यावर देखील चीनी माध्यमांनी आगपाखड केली आहे.

तैवानच्या मुद्दावरुन ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, तैवानला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जे लोक वकिली करीत आहे त्यांना शिक्षा देणे हे चीनचे कर्तव्य आहे. चीनचे राजदूत म्हणून ट्रम्प यांनी आयोवाचे गव्हर्नर टेरी ब्रान्स्टाड यांची निवड केली आहे. ब्रानस्टाड आणि टेरी यांचे चांगले संबंध आहेत.

असे असले तरी चीनच्या माध्यमांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अमेरिकेशी कसे संबंध असतील याबद्दल शंका वाटत आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी लक्षात घेता चीनने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की येणारा काळ वाईट आहे. चीनवर वाईटातील वाईट परिस्थितीशी सामना करण्याची जरी वेळ आली तरी त्यांनी डगमगून जाता कामा नये असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.