बीजिंग ते ग्वांगझूदरम्यान, सुमारे २२९८ कि.मी. अंतर धावणाऱ्या जलदगती रेल्वेची चीनने यशस्वी चाचणी केली. ही रेल्वे म्हणजे जगातील सर्वात दीर्घ पल्ल्याची जलदगती रेल्वे आहे.चाचणीदरम्यान बीजिंगहून सुटलेल्या या गाडीस झेंगझोऊपर्यंत ६९३ कि.मी. अंतर कापण्यास अवघे अडीच तास लागले. झेंगझोऊ हे बीजिंग ते ग्वांगझू या मार्गावरील उत्तरेकडील स्थानक आहे. विशेष म्हणजे हा मार्ग चीनची राजधानी आणि दक्षिण चीनमधील आर्थिक ‘हब’ मानल्या जाणाऱ्या शहरास जोडतो.
या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत सुरक्षित असून कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवल्यास त्याची तातडीने माहिती देणारी यंत्रणा येथे उपलब्ध आहे, अशी माहिती चीनच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालकांनी दिली. अपघात टाळणाऱ्या यंत्रणांसह हवामानातील बदल टिपणारी यंत्रणाही या मार्गावर बसविण्यात आली आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये बुलेट ट्रेनच्या अपघातात ४० जण मृत्युमुखी पडले होते, त्यामुळे जलदगती रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र ही नवीन रेल्वे आपल्या वेगाने वीस तासांचा प्रवास अवघ्या ८ तासांवर आणेल आणि तोही सुरक्षितपणे, असा विश्वास चीनच्या रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला.