महावाणिज्यदूतांमार्फत भूमिका स्पष्ट

परकीय आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानच्या बाजूने राहील, असे आश्वासन चीनचे लाहोरमधील महावाणिज्यदूत यू बोरियन यांनी दिले आहे. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहाबाझ शरीफ यांच्याशी भेटीत त्यांनी हे आश्वासन दिले. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या भूमिकेस चीनचा पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. चीनने म्हटले आहे की, परकीय आक्रमण झाल्यास आमचा देश पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा देईल. काश्मीर मुद्दय़ावर पाकिस्तानच्या भूमिकेस आमचा पाठिंबा आहे. काश्मीरमध्ये भारताने नि:शस्त्र लोकांवर अत्याचार चालवले आहेत त्याचे समर्थन होऊ शकत नाही. काश्मीर प्रश्न तेथील जनतेच्या आकांक्षानुसार  सोडवला गेला पाहिजे. गेल्या १८ सप्टेंबर रोजी  काश्मीरमध्ये उरी येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात १८ भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे, पाकिस्तानने मात्र हल्ल्याशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. पाकिस्तान-चीन आर्थिक मार्गिकेचा बराच भाग वादग्रस्त पट्टयातून जात असल्याने भारताने या मार्गिकेला आक्षेप घेतला आहे. यू यांनी शहाबाझ यांची भेट  घेऊन त्यांचे ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले व काश्मीरमधील स्थिती तसेच चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेच्या प्रगतीवर चर्चा केली.

 

व्यापारवाढीसाठी भारतात आयोजित केलेले प्रदर्शन पाकिस्तानकडून रद्द

इस्लामाबाद : पाकिस्तानने भारतात पुढील आठवडय़ात आयोजिक केलेले व्यापार प्रदर्शन दोन्ही देशांत उरी हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या तणावानंतर रद्द केले आहे. पाकिस्तानच्या व्यापार विकास प्राधिकरणाने (टीडीएपी) म्हटले आहे, की पाकिस्तान व भारत यांच्यातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारतात असे प्रदर्शन भरवणे योग्य नाही व २०१६ या वर्षांसाठी आधीच नियोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आता रद्द करण्यात येत आहे. आलिशान पाकिस्तान एक्झिबिशन नवी दिल्ली येथे ऑक्टोबरमध्ये होणार होते. टीडीएपीने यापूर्वी २०१२ व २०१४ मध्ये अशी प्रदर्शने यशस्वीरीत्या आयोजित केली होती. दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापाराला उत्तेजन देण्याचा हेतू या प्रदर्शनांच्या आयोजनात आहे. दोन्ही देशांचे विक्रेते व खरेदीदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न अशा प्रदर्शनात होत असतो.

दोन्ही देशांमध्ये जुलै-मे या मागील आर्थिक तिमाहीत २०६ कोटींचा द्विपक्षीय व्यापार होता व त्यात पाकिस्तानची निर्यात ४२ अब्ज डॉलर्स तर भारताची १६२ अब्ज डॉलर्स होती.