अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्याबरोबरची भेट काही तासांवर आली असताना चीनने डोळे वटारले आहेत. ओबामा-लामा यांची ही भेट रद्द करण्यात यावी, अमेरिकेने आमच्या अंतर्गत कारभारात अशाप्रकारे हस्तक्षेप केल्यास त्याचे द्विपक्षीय संबंधांवर वाईट परिणाम होतील असा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या प्रवक्त्या केटलिन हेडन यांनी सांगितले, की अध्यक्ष ओबामा हे दलाई लामा यांना हे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक व सांस्कृतिक नेते असल्याने भेटणार आहेत. व्हाइट हाऊसने ओबामा-दलाई लामा यांच्या भेटीची केलेली घोषणा चीनला चांगलीच झोंबली आहे. १९५९ मध्ये भारतात पळून गेलेले दलाई लामा यांना कुणाही परदेशी व्यक्तींनी भेटण्यास चीनचा नेहमी विरोधच आहे.
चीनच्या परराष्ट्र कार्यालयाच्या दूत हुआ चुनयिंग यांनी सांगितले, की चीनने व्यक्त केलेल्या गंभीर चिंतेचा अमेरिकेने जरूर विचार करावा व दलाई लामा यांना भेटून त्यांच्या चीनविरोधी कारवायांना खतपाणी घालू नये, याबाबत चीनने या अगोदरही अमेरिकेकडे बाजू मांडली आहे. तिबेटचा प्रश्न हा आमचा अंतर्गत प्रश्न असून त्यात हस्तक्षेप करण्याचा दुसऱ्या देशाला अधिकार नाही. ही भेट म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांचे उल्लंघन असून, त्यामुळे चीन व अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध खराब होतील. धार्मिकतेच्या नावाखाली दलाई लामा चीनमध्ये विभाजनवादी कारवाया करतात. ओबामा व दलाई लामा या दोघांनाही अनुक्रमे २०१० व २०११ची शांततेची नोबेल पारितोषिके मिळाली आहेत. तिबेटच्या स्वातंत्र्याला आम्ही मान्यता दिली नाही. यापूर्वीही अमेरिकेच्या दोन अध्यक्षांना लामा यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांनी तिबेट हा चीनचा भाग असल्याचे मान्य केले होते.