चंद्राच्या अप्रकाशित भागात चीन २०१८ मध्ये यान पाठवणार आहे. मानवाने चंद्राच्या अप्रकाशित बाजूचे फारसे संशोधन केलेले नाही, चीनच्या या मोहिमेमुळे चांद्र संशोधनात एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. चंद्राची एक बाजू गुरुत्वाकर्षण बलांमुळे पृथ्वीवरून कधीच दिसत नाही व तिचा शोधही फारसा घेतला गेलेला नाही.

चेंज ४ हे यान मानवी इतिहासात प्रथमच चंद्राच्या या भागात उतरणार असल्याचे चीनच्या चांद्र संशोधन केंद्राचे प्रमुख लिऊ झिहोंग यांनी सांगितले. चीनच्या विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय संरक्षण उद्योग खात्याअंतर्गत हे केंद्र येते. चीनने चंद्रावर यान पाठवण्याइतकी तांत्रिक क्षमता आधीच प्राप्त केलेली आहे. नासाने गेल्यावर्षी मंगळावर पाणी वाहत असल्याची घोषणा केली होती तसेत भारतानेही मंगळावर यान पाठवणारा पहिला देश म्हणून मान पटकावला आहे. त्या पाश्र्वभूमीवर चिनी प्रसारमाध्यमांनी त्यांच्या अवकाश कार्यक्रमावर टीका केली होती. चीनचा चांद्र मोहीम कार्यक्रम हा प्रगत असून डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी चंद्रावर यान उतरवले होते व त्याच्याकडून अजून संदेश मिळत आहेत.

लिऊ यांनी सांगितले की, चेंज ४ हे यान रचनेच्या दृष्टीने चेंज ३ सारखेच आहे पण त्यावर जास्त उपकरणे म्हणजे पेलोड असणार आहेत.

चंद्राच्या अप्रकाशित भागातील भूगर्भशास्त्रीय स्थितीची माहिती या यानाच्या माध्यमातून मिळणार आहे. चीनने त्यांच्या चांद्रमोहिमेत चेंज ५ यानही पाठवण्याचे ठरवले असून ते तीन टप्प्यांच्या मोहिमेतील शेवटचे यान राहील. चेंज ५ यानाची निर्मिती सध्या चीनचे वैज्ञानिक करीत आहेत. २०२२ पर्यंत चीन त्यांचे स्वत:चे अवकाश स्थानक पाठवणार आहे. चीनने मोठी स्वप्ने पाहावीत, नासाची दूरदृष्टी व एकामागून एक नवीन शोध यामुळे त्या संस्थेला जगात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे, चीनमध्येही नासा संस्थेला जास्त मानले जाते, नासाने इतर अवकाश स्पर्धकांना मागे टाकले आहे. त्यांनी मंगळावर १९६४ पासून २० याने पाठवली होती, क्युरिऑसिटी ही यंत्रमानवसदृश गाडी अजून मंगळावर असून ती संदेश पाठवत आहे, भारतानेही मंगळयान मोहीम यशस्वी केली आहे त्यामुळे चिनी वैज्ञानिकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असे ग्लोबल टाईम्सने गेल्या वर्षी त्यांच्या संपादकीयात म्हटले होते.