जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर याला दहशतवादी घोषित न करण्याबाबत चीनने दिलेल्या तांत्रिक नकाराची वैधता सहा महिने होती ती आता संपत असून पठाणकोट हल्ल्यातील सूत्रधार असलेल्या अझरला आता चीनने नकाराधिकार न वापरल्यास दहशतवादी घोषित केले जाऊ शकते.

यावर्षी ३१ मार्चला चीनने नकाराधिकार वापरून मौलाना मसूद अझरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रस्तावात संयुक्त सुरक्षा मंडळाच्या बैठकीत नकाराधिकार वापरला होता. सुरक्षा मंडळाची र्निबध समिती दहशतवादी व्यक्ती किंवा संघटना यांच्यावर र्निबध जारी करीत असते. संयुक्त राष्ट्रात भारताने अझरला दहशतवादी जाहीर करण्यासाठी सादर केलेल्या अर्जावर १४ देशांनी पािठबा दिला होता, पण चीनने विरोध केला होता. १२६७ क्रमांकाच्या र्निबध यादीत जर त्याचे नाव टाकले असते तर अझरची मालमत्ता गोठवण्यात आली असती व त्याच्या प्रवासावर बंदी घातली गेली असती. सूत्रांनी सांगितले, की मासूद याला दहशतवादी न ठरवण्याच्या चीनच्या तांत्रिक मुद्दय़ाची वैध मुदत १७ दिवसात संपत आहे. भारताने परत प्रस्ताव मांडला व चीनने त्याला विरोध केला नाही तर मौलाना मासूद अझर याला दहशतवादी घोषित केले जाईल.