चीनचे सैनिक पाकिस्तानी लष्कराला जम्मू-काश्मीर सीमेजवळ प्रशिक्षण देत आहेत. भारतीय संरक्षण संस्थांनी एका अहवालात ही माहिती दिली असून हा अहवाल बीएसएफच्या एका गुप्तचर संस्थेने तयार केला आहे.
सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय सीमेजवळच राजूरी जिल्ह्याच्या समोरील भागात चीनी फौजा पाकिस्तानी सैन्याला ‘शस्त्रास्त्र वापराची‘ तंत्रे शिकवत असल्याचे उघडकीस आले आहे.   तसेच पंजाबच्या अबोहर आणि गुरदासपुर सेक्टर पलिकडे पाकिस्तानने अनेक चौक्या तयार केल्या आहेत. काही पाकिस्तानी लष्कराच्या तुकड्यांनी श्रीगंगानगर भागाच्या विरुद्ध भागातील पाकिस्तानी रेंजर्सच्या निमलष्करी तळांचा ताबा घेतला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि रेंजर्स भारतीय सैनिक आणि साधन सामुग्री व संपत्तीला निशाणा बनवण्याची योजना आखत आहेत. त्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाण्यांवर स्नायपर तैनात करत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा आणि लाइन ऑफ कंट्रोल जवळ पाकिस्तानच्या लष्करातील विशेष कमांडोंचे पथक देखील तैनात केले गेले आहे. हे पथक भारतीय हद्दीत हल्ला देखील करु शकते, असे बीएसएफच्या अहवालात म्हटले आहे.