चिनी सैन्याने उत्तराखंडनजीकच्या भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे बुधवारी उघडकीस आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. हरिश रावत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार येथील चामोली जिल्ह्यातील भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी केली आहे. मात्र, या भागातील महत्त्वाच्या कालव्यांपर्यंत चिनी सैन्य पोहोचलेले नाही, ही समाधानाची बाब आहे. केंद्र सरकार या प्रकरणाची योग्य ती दखल घेईल, अशी आशा मी करत असल्याचे रावत यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारकडून याबाबत माहिती मिळालेली नाही. उत्तराखंडचा तब्बल ३५० किलोमीटरचा परिसर चिनी सीमारेषेला लागून आहे. यापूर्वीही चिनी सैन्याने या भागातील मना पास परिसरात घुसखोरी करून येथील दगडांवर ‘चायना’ असे लिहून ठेवले होते. जून महिन्यात चीनने अरूणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी केल्याचे आरोप फेटाळून लावले होते. या भागातील सीमारेषा अजूनही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे चिनी सैन्य या भागात गस्त घालत असल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत नव्या यंत्रणांमुळे या भागात गस्त घालणाऱ्या दोन्ही लष्करांमधील तणाव काहीसा कमी झालेला आहे. भारताने यापूर्वी तणाव टाळण्यासाठी निश्चित केलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमीरेषेचा प्रस्ताव चीनने फेटाळून लावला होता.