चीनचे राष्ट्राध्यक्ष झी जिनपिंग यांचे तीन दिवसांच्या भारतभेटीसाठी बुधवारी अहमदाबादमध्ये आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिनपिंग यांचे स्वागत केल्यानंतर अवघ्या काही तासांतच दोन्ही देशांमध्ये तीन महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱया झाल्या. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिनपिंग यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिंनपिंग यांच्यासाठी मोदींनी बुधवारी संध्याकाळी विशेष मेजवानीही ठेवली आहे.
गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विमानतळावर जिनपिंग यांचे स्वागत केले. जिनपिंग यांच्यासोबत त्यांची पत्नी पेंग लियुआनदेखील आल्या आहेत. गुजरातमधून भारत दौऱयांची सुरुवात करणारे ते पहिले महत्त्वाचे परदेशी नेते ठरले आहेत. जिनपिंग यांना विमानतळावर भारतीय लष्कराकडून सलामी देण्यात आली. मोदी मुख्यमंत्री असताना अनेकवेळ चीनला गेले होते. या दौऱयांमध्ये त्यांनी चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. जिनपिंग यांच्या स्वागतासाठी स्वतः मोदी अहमदाबादमध्ये आले आहेत. जिंनपिंग यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.