चिनी व्यंजनांनी जगभरातील खाद्यवेडय़ांना भुरळ घातली असली आणि महासत्तेचा मुकुट मिरविण्यासाठी सर्व मार्गानी कार्यरत असली, तरी अन्न नासाडीमध्ये चीन हे राष्ट्र आघाडीवर असल्याचे पुढे आले आहे. दरवर्षी चीनमध्ये होणारी अन्न नासाडी ३२.६ अब्ज डॉलर किंमतीइतकी आहे. जगभरातील २० कोटी लोकांना पुरेसे असे अन्न-धान्य चीन दरवर्षी वाहतूक आणि साठवण प्रक्रियेमध्ये वाया घालविते, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते.
नासखोरीचा प्रकार
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी या वर्षीच्या सुरुवातीला आखलेल्या राष्ट्रव्यापी मोहिमेमध्ये सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये अन्न-धान्य यांच्या वापराबाबत निर्देश दिले होते. त्याचबरोबर अन्न-नासाडीवर नियंत्रण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून चीनमध्ये होत असलेल्या अन्न नासाडीबाबत जागृती करण्यासाठी सोमवारी राष्ट्रव्यापी कार्यक्रम घेण्यात आला. चीनच्या राज्य धान्य व्यवस्थापनाचे उपसंचालक वू झिदान यांच्या मते दरवर्षी २०० अब्ज युआन किमतीचे अन्न टाकून दिले जाते. या अन्नामध्ये किमान जगातील २० कोटी भुकेल्या जिवांना पुरेसे अन्न मिळू शकेल.
नासखोरीची कारणे
अन्नदात्याचा सन्मान ठेवण्याच्या चालीरीतींमुळे थाळीत आलेले सर्व पोटात ढकलण्याऐवजी थाळीत ठेवण्याचा प्रकार देशात आहे. सर्व अन्न फस्त केल्यास त्या घरात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होतो, अशी जुनी समजूत असल्यामुळे  अन्न नासाडी केली जाते. याशिवाय ३५ अब्ज किलो धान्य साठवणूक प्रक्रियेतील दोष आणि वाहतूक यंत्रणेतील अडथळ्यांमुळे नष्ट होते.
भारत अभ्यासक?
चीनमधील महाकाय साठवणूक यंत्रणा आणि अन्नधान्य वाहतूक यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी भारतीय पथक नुकतेच चीनमध्ये गेले होते. मात्र या यंत्रणेमधील कच्चे दुवे आणि नष्ट होणाऱ्या अन्नधान्याची गांगरून टाकणारी आकडेवारी पाहता, भारतीय अभ्यासकांनी पाहिले आणि शिकले काय, असा प्रश्न निर्माण होतो.