हिंदू महिलेचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्याच्या आरोपावरून मध्य प्रदेशमध्ये एका ख्रिश्चन दाम्पत्याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले. मध्य प्रदेशमधील धर्मांतरणविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे खारगोनचे पोलीस अधीक्षक अमित सिंग यांनी सांगितले.
खारगोन जिल्ह्यातील बिटनेरा गावातून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये देण्याचे आमीष विल्सन आणि रश्मिता या दाम्पत्याने कमलाबाई या महिलेला दिले. त्याविरुद्ध त्यांनी पोलीसांकडे तक्रार केल्यावर पोलीसांनी ही कारवाई केली. विल्सन आणि रश्मिता हे दाम्पत्य मूळचे चेन्नईमधील आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते खारगोनमध्ये स्थायिक झाले असल्याचे समजते. नाताळ साजरा करण्यासाठी आपण बिटनेरा गावामध्ये आल्याचे या दाम्पत्याने पोलीसांना सांगितले. मात्र, बिटनेरा गावामध्ये चर्च किंवा ख्रिश्चन समाजाची एकही संस्था नसल्यामुळे या दोघांना या गावात येण्याचा उद्देश काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत, असे अमित सिंग म्हणाले. खारगोन या जिल्ह्याच्या ठिकाणी हे दाम्पत्य कुठे वास्तव्यास होते, याचाही शोध अद्याप पोलीसांना लागलेला नाही.