ज्येष्ठ नागरिकाच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न
एका ज्येष्ठ नागरिकाच्या सेवानिवृत्तीवेतनाच्या प्रश्नावरून केंद्रीय माहिती आयुक्तांनी (सीआयसी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाला चांगलेच फटकारले आहे. आपल्या निवृत्तिवेतनाबाबतची स्थिती जाणून घेण्याची इच्छा असलेल्या ज्येष्ठ नागरिकाची याचिका २९ खात्यांमध्ये पाठविण्यापूर्वी सारासार विचार केला नाही, असे आयोगाने म्हटले आहे.
माहितीच्या अधिकारात आलेले अर्ज अन्य विभागांकडे पाठविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रथेची कीव करावीशी वाटते, असे आयोगाने म्हटले आहे. दिल्ली सरकारमधील सर्व प्रकारच्या निवृत्तिवेतनाबाबतची स्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका सादर करावी, देयके अद्याप का देण्यात आली नाहीत त्याची कारणे स्पष्ट करावी, थकबाकी कधी देणार ते स्पष्ट करावे आणि वेतन कधी देणार ते २० दिवसांत स्पष्ट करावे, असा आदेश आयोगाने दिला आहे.
चरणजितसिंग भाटिया या अर्जदारांना एका लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश माहिती आयुक्त श्रीधर आचार्यलू यांनी दिले आहेत.
ज्या माहिती अधिकाऱ्यांनी अन्य खात्यांकडे अर्ज पाठविला त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असेही आचार्यलू यांनी म्हटले आहे.