कर्करोगावर मात करण्यासाठी प्रतिकारशक्तीवर आधारित नवीन उपचारपद्धती विकसित करण्यात आली असून चिलीतील सँटियागो येथे या पद्धतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यात मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात. ही उपचार पद्धती अजून वैद्यकपूर्व अवस्थेत आहे, असे संशोधक क्लॉदियो अॅक्युना यांनी सँटियागो विद्यापीठात सांगितले. या पद्धतीचे अमेरिकेत लवकरच पेटंट घेतले जाणार आहे.
अॅक्युना यांनी सांगितले की, या उपचारपद्धतीत कर्करोगाविरोधी लस तयार करणे शक्य आहे. कर्करोगाची लक्षणे दिसत असलेल्या लोकांना ती देता येईल व त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाच्या पेशी मारल्या जातील. कर्करोग होणारच नाही असे नाही, पण त्यासाठी ही पर्यायी उपचारपद्धती ठरणार आहे. इतर अवस्थांमध्ये रूग्णांवर चाचणी करण्याकरिता परवानगी लागणार आहे, पण या प्रकल्पामुळे कर्करूग्णांचे आयुर्मान निश्चित सुधारेल व सुसह्य़ होईल. पारंपरिक उपचारपद्धतींना पूरक अशी ही उपचार पद्धती असेल. त्यामुळे कर्करोगावरचा जागतिक पातळीवरील उपचार खर्च इतर उपचारपद्धतींच्या तुलनेत ७० टक्के कमी होईल. या प्रतिकारशक्तीवर आधारित पद्धतीने स्तन, त्वचा, फुफ्फुसे, आतडे, पूरस्थ ग्रंथी यांचा पुढच्या अवस्थेत गेलेला कर्करोगही बरा करणे शक्य आहे. या पद्धतीचे कुठलेही इतर वाईट परिणाम नसून उपचार खर्च ७५० डॉलर्स इतका असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे १ कोटी रूग्ण नव्याने सापडतात. २०१२ मध्ये कर्करोगाने ८२ लाख लोक मरण पावले होते.
कर्करोगावरील नवी उपचार पद्धती
खर्च ७५० डॉलर्स
अमेरिकी पेटंट घेणार
प्रतिकारशक्तीवर आधारित
वाईट परिणाम नाहीत
संशोधक- सँटियागो विद्यापीठाचे क्लॉदियो अॅक्युना