आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत पुण्यातील हचिंग्स हायस्कूलमधील मुस्कान पठाण देशात पहिली आहे. मुस्कान आणि बंगळुरुच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील अश्विन राव या दोघींनी ९९.४ टक्के गूण मिळवत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.

द काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकीट एक्झामिनेशनतर्फे (सीआयएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परीक्षेत कोलकाताच्या हेरिटेज स्कूलमधील अनन्या मैती देशभरात पहिली आली. अनन्याने ९९.५० टक्के गूण मिळवले. तर लखनौचा आयूष श्रीवास्तव, कोलकात्याचा देवेश लखोटीया, मुंबईची रिशिता धारिवाल आणि गुडगावची किर्थना श्रीकांत हे चौघे संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या चौघांनाही ९९.२५ टक्के मिळाले आहे.

आयसीएसईच्या विद्यार्थ्याांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर आणि एसएमएसद्वारे निकाल पाहता येणार आहे. बोर्डाच्या http://www.cisce.org या संकेतस्थावर निकाल बघता येईल. एसएमएसद्वारे निकाल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सात अंकी यूनिक आयडी कोड टाईप करुन ०९२४८०८२८८३ या क्रमांकावर पाठवावा.

गेल्या वर्षी आयसीएसई बोर्डाचा निकाल ६ मेरोजी जाहीर झाला होता. पण यंदा विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकींमुळे निकालाला विलंब झाला होता.