अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीडनबाबत केलेल्या विधानाने तेथील राजकीय नेते व सामान्य नागरिक बुचकळ्यात पडले आहे. ट्रम्प यांना त्यांच्या देशाबाबत नेमके काय म्हणायचे होते हे जाणून घेण्यासाठी ते डोके खाजवू लागले आहेत. ट्रम्प यांना नेमके काय म्हणायचे होते याचा खुलासा करावा, अशी विनंती स्वीडनच्या सरकारने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडे केली आहे.

‘पाहा, काल रात्री स्वीडनमध्ये काय घडत होते. स्वीडनमध्ये असे काही घडेल असे कधी वाटले होते का? त्यांनी मोठय़ा प्रमाणात त्यांना आत घेतले. आता कधी विचारही केला नसेल अशा अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे,’ असे ट्रम्प शनिवारी एका सभेत म्हणाले.

ट्रम्प यांच्या वक्तव्याने स्वीडनवासीयांना संभ्रमात टाकले आहे. ट्रम्प यांच्या बोलण्याचा नेमका रोख काय होता हे समजून घेण्यासाठी तेथील नेते आणि नागरिक प्रयत्न करत आहेत. ‘मी जे काही बोललो त्याचा संबंध फॉक्स न्यूज या टेलिव्हिजन वाहिनीवर मी स्वीडनमधील स्थलांतरितांविषयी जे काही पाहिले त्याच्याशी संबंधित होते,’ असा खुलासा ट्रम्प यांनी केला. मात्र त्यानेही स्वीडनवासीयांच्या शंका दूर होण्याऐवजी वाढल्याच आहेत.

ट्रम्प यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे स्वीडनच्या परराष्ट्र  खात्याच्या प्रवक्त्या कॅटरिना अ‍ॅक्सलसन यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया नोंदवताना केलेल्या ट्वीटमध्ये स्वीडनच्या परराष्ट्रमंत्री मारगॉट वॉलस्ट्रॉम यांनी म्हटले की, लोकशाही आणि कूटनीतीमध्ये आपण विज्ञान, तथ्ये आणि प्रसारमाध्यमांचा आदर करण्याची गरज असते.

स्वीडनमधील प्रसारमाध्यमांनी आपापल्या परीने ट्रम्प यांच्या विधानाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि शुक्रवारी स्वीडनमध्ये कोणतीच फारशी नोंद घ्यावी अशी घटना घडली नसल्याचे सांगितले.

काही जणांच्या मते ट्रम्प यांचा रोख फॉक्स न्यूजने शुक्रवारी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमाकडे असावा. फॉक्स न्यूजने ‘टकर कार्लसन टुनाइट’ या कार्यक्रमात सांगितले होते की, स्वीडनने गेल्या वर्षी १,६०,०००हून अधिक निर्वासितांना आश्रय दिला असून त्यापैकी केवळ ५०० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. या कार्यक्रमात काही खिडक्यांच्या काचा फोडल्याची व आगीची दृश्ये दाखवण्यात आली होती. तसेच स्थलांतरितांचे लोंढे देशात आल्यानंतर बंदूकधाऱांकडून होणारे गुन्हे आणि बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत, असेही त्या कार्यक्रमात म्हटले होते. प्रत्यक्षात सीरिया आणि इराकमधून मोठय़ा प्रमाणात निर्वासित येऊनही स्वीडनमधील गुन्हेगारीचा दर २००५ पासून कमी होत आहे.

देशात काहीच मोठे घडलेले नसताना ट्रम्प यांनी असे विधान का करावे हे उमगले नसलेल्या स्वीडनवासीयांनी समाजमाध्यमांवर ट्रम्प यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. हे पाहा काल रात्री स्वीडनमध्ये काय घडले अशा आशयासह बर्फात निवांत फिरणारे रेनडिअर, स्वीडिश मीटबॉल नावाचा खाद्यपदार्थ तसेच ‘आयकिया’ नावाच्या स्वीडनमधील फर्निचर कंपनीचे फर्निचर घरात मांडणारे नागरिक अशी छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास स्वीडनच्या नागरिकांनी सुरुवात केली आहे.