भारतातील असहिष्णूतेच्या वाढत्या घटनांबद्दल अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशमधील घटनांचा उल्लेख करताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बे यांनी भारतातील असहिष्णूतेसंदर्भात भाष्य केले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात योग्य कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमधील मंदसौर रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून दोन मुस्लिम महिलांना हिंदू दलाच्या महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण करण्यात आली होती. तसेच गुजरातमधील उनामध्ये गाईच्या कातड्यावरुन चार दलितांना मारहाण करण्यात आली होती. देशात धार्मिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठिशी असल्याचे आश्वासन यावेळी अमेरिकेकडून देण्यात आले. असहिष्णुतेचा चिंतेचा विषय हाताळण्यासाठी आम्ही जगभरातील देशांना मदत करत आहोत, तसेच भारतीय नागरिकांचा सहिष्णू  दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे किर्बे यांनी स्पष्ट केले. गुजरातमधील उणामध्ये झालेल्या मारहणातील पीडित बालू सावरिया याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या माहितीनुसार, गायीला मारले नसून  शेजारच्या गावातील नाजाभाई अहिर यांनी फोनवरून त्यांची गाय सिंहाने ठार केल्याचे सांगत गाईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला बोलावल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.