सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांना शनिवारी जम्मू – काश्मीरमधील शाळांच्या बिकट अवस्थेवर बोलताना अश्रू अनावर झाले. जम्मूमधील एका शाळेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. येथे सरकारला खूप आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. पण शिक्षण असे क्षेत्र आहे की तेथे कोणताही समझोता करू शकत नाही. कारण हा विकासाचा एकमेव मार्ग आहे, असे ते यावेळी म्हणाले.

मला ठाऊक आहे की, दहशतवादामुळे ३० वर्षांपासून येथील परिस्थिती अतिशय वाईट आहे. येथील मुले शिकू नयेत, हेच त्या दहशतवादी शक्तींना हवे आहे. लोकांना दहशतवादाच्या दरीत ढकलण्यासाठी आता ते शाळाही पेटवून देत आहेत, असे सरन्यायाधीश ठाकूर म्हणाले. पण हे सर्व बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

जम्मूमध्ये अनेक मुले शाळेकड़े पाठ फिरवत आहेत. काश्मीरमध्ये शाळा पेटवून दिल्या जात आहेत. त्यामुळेच शाळांकडे पाठ फिरवू लागले आहेत. पण मला अजूनही आशा आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, हिजबुलचा कमांडर बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळून आला होता. संचारबंदीमुळे शालेय शिक्षणावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. खोऱ्यात अनेक शाळा पेटवून दिल्या होत्या. आता मात्र, येथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.