सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश टि. एस. ठाकूर चांगलेच संतप्त झाले. वकिलांकडून मोठा गोंगाट होत असल्याने ठाकूर यांनी वकिलांना चांगलेच सुनावले. ‘तुम्ही शांत बसा. तुम्ही कशासाठी आरडाओरड करत आहात ? हे न्यायालय आहे की मासळी बाजार ?’ अशा शब्दांमध्ये टि. एस. ठाकूर यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.

सुनावणी सुरू असताना एकमेकांसोबत बोलण्यात मग्न असलेल्या वकिलांची मुख्य न्यायाधीश टि. एस. ठाकूर यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. ‘तुम्ही गप्प बसा, अन्यथा मला तुम्हाला बाहेर काढावे लागेल. न्यायालयाचा आदर करायला हवा. ज्या लोकांना न्यायालयात स्वत:ला सांभाळता येत नाही, त्यांना वरिष्ठ वकील व्हायचे आहे,’ अशा शब्दांमध्ये ठाकूर यांनी उपस्थित वकिलांना फैलावर घेतले.

मुख्य न्यायाधीश टि. एस. ठाकूर यांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना कठोर शब्दांमध्ये सुनावले. ‘तुम्ही शांत बसा. या न्यायालयाचा आदर करा. हे न्यायालय आहे की मासळी बाजार ? सोली सोराबजींकडे पाहा. त्यांच्याकडून काहीतरी शिका. जोरजोरात ओरडल्याने तुम्हाला मदत होईल असे तुम्हाला वाटते का ?’, असा प्रश्न यावेळी ठाकूर यांनी उपस्थितांना विचारला.

काही वकिलांना वरिष्ठता मिळावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी ही याचिका दाखल केली होती. ‘बार काऊन्सिलमध्ये वरिष्ठ वकिलांचा एकाधिकार चालतो. त्यामुळे न्याय मिळवण्यात अडचणी येतात. त्यामुळे सर्व वकिलांना न्याय देणारी यंत्रणा अस्तित्वात यायला हवी’, असे इंदिरा जयसिंग यांनी यावेळी म्हटले.