नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील याचिकांच्या सुनावणीवेळी न्यायालयात मासळी बाजारासारखा गोंधळ होता, अशा तीव्र शब्दांत देशाचे मावळते सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी शनिवारी आपली नाराजी व्यक्त केली. मी माझ्याबरोबर कशाप्रकारच्या आठवणी घेऊन चाललो आहे. कनिष्ठ वकील आरडाओरडा करून त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणत होते. त्यावेळी न्यायालयात एखाद्या मासळी बाजारासारखे वातावरण निर्माण झाले होते. माझ्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत मी अशाप्रकारचे बेलगाम वर्तन कधीच पाहिले नव्हते, अशी खंत टी.एस. ठाकूर यांनी व्यक्त केली.

काल सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सरकारच्या निश्चलनीकरणाच्या धोरणामुळे देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्वसामान्यांसाठी काय उपाय योजले आहेत, यासंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी सरकारच्यावतीने युक्तिवाद सादर केला. तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.  मात्र, यावेळी काही वकील मोठ्याने बोलून त्यांच्या बोलण्यात अडथळे आणत होते. या सगळ्या प्रकाराविषयी सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. ही एखाद्याशी वाद घालण्याची पद्धत नाही. तुम्ही न्यायालयाला मासळी बाजार बनवले होते. तुम्हा लोकांना कपिल सिब्बल यांच्यासारख्या जेष्ठ वकिलाला बोलूनच द्यायचे नव्हते. पी. चिदंबरमही बोलायला उभे राहिले नव्हते. हे अत्यंत दुर्देवी होते. माझ्या २३ वर्षांच्या कारकिर्दीत मी अशाप्रकारचे वर्तन कधीच पाहिले नव्हते. सरन्यायाधीश म्हणून कामकाजाचा हा माझा शेवटचा आठवडा आहे. मी अत्यंत जड अंत:करणाने हे पद सोडणार आहे. त्यावेळी न्यायालयात थोडीही सभ्यता पाळली गेली नव्हती. सरन्यायाधीशांच्या न्यायालयात असूनही त्याठिकाणी सभ्यतेचा लवलेशही नव्हता. तुम्हाला अशाप्रकारे वागण्याची मुभा नाही, अशा शब्दांत टी.एस. ठाकूर यांनी गोंधळ घालणाऱ्या वकिलांना खडे बोल सुनावले.