जम्मू आणि काश्मीरमध्ये ईदगाह मैदानात स्थानिक आणि सुरक्षा दलांमध्ये बाचाबाची झाली. श्रीनगरमधील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धूराचा वापर केला. जम्मू काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन पोलिसांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्याची परवानगी नाकारली होती.

जम्मू काश्मीरमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार होते. मात्र ईदगाह मैदानावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती. मात्र तरीही लोक मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर जमा झाले होते. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव अश्रू धुराचा वापर करावा लागला. यासोबतच अनंतनागमध्येदेखील जमाव आणि सुरक्षा दलाचे जवान आमनेसामने आले.

मागील आठवड्यात गुरुवार रात्री जम्मू काश्मीरमध्ये पोलीस उप अधीक्षक मोहम्मूद अयूब पंडित यांची नौहट्टामधील जामिया मशिदीजवळ जमावाने मारहाण करुन हत्या केली. उप अधीक्षक मोहम्मूद अयूब पंडित जामिया मशिदीजवळ सुरक्षेसाठी तैनात होते. मोहम्मद अयूब पंडित यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांचा मृतदेह गटारात फेकून देण्यात आला होता. यानंतर ‘राज्यातील पोलिसांनी अधिक संयमाने कृती करायला हवी,’ असे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले होते.

लोकांनी चोख पोलीस बंदोबस्त असलेल्या मशिदींमध्येच नमाज अदा करावा, अशा सूचना जम्मू काश्मीर पोलिसांकडून करण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून या सूचना सामान्य नागरिकांना देण्यात आल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये वारंवार पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. यामध्ये अनेक पोलिसांना जीवदेखील गमवावा लागला आहे. अयुब पंडित यांच्या हत्येनंतर पोलिसांनी श्रीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.