पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने राज्यातील १७० हायप्रोफाइल लोकांची सुरक्षा हटवली आहे किंवा कपात तर केली आहे. सरकारने या १७० लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या ४१३ बंदूकधारी सुरक्षा रक्षकांना माघारी बोलावले आहे. या हायप्रोफाइल लोकांत पर्यटन व सांस्कृतिक मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर प्रकाशसिंह बादल यांचे जावई आदेश केरान आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांचाही समावेश आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल आणि त्यांचे मेव्हणे विक्रम मजिठिया यांना झेड सुरक्षा मिळाली आहे.

नवज्योत कौर यांनी आपले पती नवज्योतसिंग सिद्धूंनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वत: विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सिद्धू यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरूनच विधानसभा निवडणूक लढली आणि दणदणीत विजय मिळवला होता. पंजाबमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच अमरिंदर सिंग सरकारने त्यांना पर्यटन मंत्री बनवले.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपल्या पहिल्याच बैठकीत राज्यातील व्हीआयपी संस्कृती संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर मंत्र्यांना लाल, पिवळा आणि निळा दिवा हटवण्याचा निर्णय घेतला होता. बैठकीनंतर ट्विटरवरून अमरिंदर सिंग यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील कंत्राटदारांची संख्याही कमी केली होती. कॅबिनेटच्या बैठकीत त्यांनी लोकपाल विधेयकाबाबतही निर्णय घेतला होता. महिलांना सरकारी आणि करार पद्धतीच्या नोकरीमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. पोलिसांच्या कामाची वेळ निश्चित करण्यासाठीही निर्णय घेण्यात आला.