राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी देशातील विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान भाजपच्या कट्टर विरोधक असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आश्चर्यकारकरित्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतीपदासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अडवाणींना राष्ट्रपतीपदी पाहण्यास आपल्याला आवडेल असे त्यांनी एका बंगाली वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याचबरोबर जर केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज किंवा लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन या भारताच्या प्रथम नागरिक बनल्यास आपली त्यांना ना नसेल, अशी जोडही त्यांनी दिली.
एकीकडे अडवाणींना पाठिंबा देताना मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. भाजप राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. तृणमूल काँग्रेसने मणिपूरमध्ये भाजपला दिलेल्या पाठिब्यांबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, हा प्रकार ईशान्य भारतात घडला आहे. तिथे राजकारणावर पैसा भारी पडला आहे. मी तेथील आमदाराला ओळखतही नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी या वेळी दिले.
उत्तर प्रदेशमधील निकाल आपल्याला मान्य नसल्याचे त्या म्हणाल्या, यूपीत अंतिम आकडेवारीत घोळ घालण्यात आला आहे. मायावती यांच्याप्रमाणेच अखिलेश यादव आणि काँग्रेसने इव्हीएम बाबत निवडणूक तक्रार दाखल न केल्याबद्दल मला आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक बसप व समाजवादी पक्षाने एकत्रित लढण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. यूपीत काँग्रेस कमजोर असल्याचेही त्या म्हणाल्या.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसच देशाचे नेतृत्व करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच अनेक राज्यातील नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.