पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. काही जण मनात येईल ते बोलतात, मी मात्र पुराव्याशिवाय बोलत नाही. मला काय बोलायचे याच्या मर्यादा माहीत आहेत, अशा शब्दांत ममतांनी येथील कार्यक्रमात शहा यांना फटकारले आहे.
अमित शहा यांनी ३० नोव्हेंबरच्या जाहीर सभेत शारदा चिट फंडाचा पैसा वर्धमान स्फोटांसाठी वापरल्याचा आरोप केला होता. तसेच राष्ट्रीय तपास संस्थेला याबाबत चौकशी करू दिली जात नसल्याचा गौप्यस्फोट शहा यांनी केला होता. केंद्रानेदेखील शहा यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट केले होते. ममतांनी शहा यांना प्रत्युत्तर देत, घोटाळ्याचा पैसा आम्हाला नको. या प्रकरणी सूत्रधाराला आम्हीच अटक केली आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मलाच अटक करा, असे आव्हान ममतांनी पुन्हा दिले आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये मुद्दाम सरकारची प्रतिमा डागाळत असल्याचा आरोप ममतांनी केला. भेसळयुक्त अन्न जसे आपण कधीही खात नाही तसेच भेसळयुक्त बातम्याही टाळाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.