मेहबूबा मुफ्ती यांची सूचना

हिंसेचा मार्ग सोडण्यास जे कोणी तयार आहे त्या सर्वाशी काश्मीर मुद्दय़ावर चर्चा करा, अशी सूचना जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. काही मूठभर लोक युवकांना भडकावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या पद्धतीने काश्मीर मुद्दय़ावर विविध घटकांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर प्रयत्न केले तोच धागा पकडून वाटचाल करण्याची गरज असल्याचे मेहबूबा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. चर्चेवर आता लोकांचा विश्वास नाही असे चित्र आहे त्याची चिंता आहे. त्यामुळे त्यासाठी पहिल्यांदा वातावरण तयार करायला हवे. चर्चेसाठी विश्वासार्ह लोकांना पुढे करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला तयारी दर्शवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर मुद्दय़ावर ज्यांना मार्ग काढायचा आहे. मात्र तो काही दिवसांत किंवा महिन्यांत सुटणार नाही हे ध्यानात ठेवावे, असा सल्ला दिला आहे.

हुरियतशी चर्चेचा फायदा होईल काय असे विचारता, ज्यांना शांतता हवी आहे तसेच परिस्थिती सुधारण्यास मदत करण्याची इच्छा आहे त्यांची चर्चा होईल, असे उत्तर त्यांनी दिले. चर्चेशिवाय पर्याय नाही हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. यापूर्वी ज्या चर्चा झाल्या त्यापेक्षा अधिक प्रभावी पद्धतीने संवाद कसा साधता येईल याचा विचार पंतप्रधान तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने करावा, असे त्यांनी सुचवले.

द्विराष्ट्र सिद्धांत धुडकावून भारतात सामील व्हायचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीरचा मुद्दा हे स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.

मेहबूबा मुफ्ती, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री