राज्य विधानसभेच्या निवडणुका पोषक व शांत वातावरणात होऊ देण्याचे श्रेय सीमेपलीकडील लोकांना (म्हणजे अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तान, हुर्रियत आणि दहशतवादी संघटना यांना) द्यायला हवे, असे वक्तव्य मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर लगेचच करून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले.  ‘त्या लोकांनी काही केले असते, तर निवडणुका शांततेत होणे शक्य नव्हते. छोटीशी कृतीही निवडणुकांमध्ये अडथळा आणण्यासाठी पुरेशी होती, पण त्यांनी ही लोकशाही प्रक्रिया सुरू ठेवण्याची मुभा दिली’, असे ते म्हणाले.  फुटीरवाद्यांना शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय देणाऱ्या सईद यांच्या वक्तव्याबाबत वादात सहभागी होणे भाजपने टाळले. निवडणूक आयोग, सुरक्षा संस्था आणि भारतीय घटनेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वामुळे काश्मिरातील निवडणुका शांततेत झाल्या, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी दिली.
काश्मीरमध्ये ‘कमळ’साथ!
पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी रविवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने कलम ३७० बाबत ‘जैसे थे’ स्थिती राखण्याचे मान्य करून आपली या विषयावरील भूमिका बदलल्यामुळे पीडीपी व भाजप यांच्या आघाडीचे सरकार राज्यात सत्तारूढ होऊ शकले. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी सईद यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.