मध्य प्रदेशातील गाजलेल्या ‘व्यापम’ घोटाळ्यासंदर्भात मुलाखत घेण्यासाठी आलेले व संशयास्पदरीत्या मरण पावलेले पत्रकार अक्षय सिंग यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाने गठित केलेल्या विशेष तपास पथकाला लिहिणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
या घोटाळ्याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. त्यावर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सीबीआय किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत तपास करण्याचे निर्देश दिल्यास आपल्या सरकारची काही हरकत असणार नाही, असे चौहान पत्रकार परिषदेत म्हणाले.
सिंग यांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी असून आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. सिंग यांच्या मृतदेहाची शनिवारी गुजरातच्या दाहोद जिल्ह्य़ातील इस्पितळात शवचिकित्सा करण्यात आली असून त्याचा अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे, असे चौहान म्हणाले.
प्रत्येक मृत्यू दुर्दैवी आणि दु:खद आहे. या घोटाळ्यातील सर्वच मृत्यूंचा तपास व्हायला हवा असे आम्हाला वाटते आणि त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयाला पूर्वीच विनंती केली आहे. व्यापम घोटाळ्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) होत असून न्यायालय त्यावर देखरेख ठेवून आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सीबीआयमार्फत चौकशीची काही गरज नाही. सरकारची या तपासात काहीही भूमिका नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने (व्यापम) केलेल्या प्रवेश आणि भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे उघडकीला आल्यानंतर आपणच सर्वप्रथम त्याच्या तपासाची सुरुवात केल्याचा दावा चौहान यांनी केला. काँग्रेस या प्रकरणी अफवा पसरवत असून, त्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणे मला आवश्यक वाटत नाही असे ते म्हणाले.