सीएनआर राव यांना रसायनशास्त्रातील सचिन तेंडुलकर म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी या एप्रिलमध्ये ‘एच इंडेक्स १००’ हा सन्मान प्राप्त केला आहे. त्यांचा एच इंडेक्स हा १०६ आहे. विज्ञान क्षेत्रातील हे शतकच म्हणायला हवे.
राव यांनी केलेले संशोधन प्रचंड आहे. त्यांचे एकूण १५०० शोध निबंध प्रसिद्ध आहेत, त्यांची कारकीर्द पन्नास वर्षांची तर सचिनची २४ वर्षांची आहे. अनेक वैज्ञानिक संस्थांचे राव हे सदस्य आहेत. ‘एच इंडेक्स’ ही संकल्पना प्रथम २००५ मध्ये भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज हिर्श यांनी आणली. एच इंडेक्स हा एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या शोधनिबंधांची संख्या दर्शवतो किंबहुना जास्तीत जास्त संशोधकांनी ज्यांचे संशोधन संदर्भ म्हणून घेतले त्यात त्यांची गणना होते. काहींच्या मते एच-इंडेक्स हा वैज्ञानिकाचा दर्जा ठरवण्याचा निकष नाही. असे असले तरी किमान ५०००० सायटेशन वाटय़ाला आलेले ते एकमेव भारतीय वैज्ञानिक आहेत.
पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत राव यांनी सॉलिड स्टेट अँड स्ट्रक्चरल केमिस्ट्री या विषयात संशोधन केले. नॅनो मटेरियल्स या विषयातही त्यांनी संशोधन केले. राव यांचे अनेक सहकारी निवृत्त झाले पण त्यांनी मात्र सतत संशोधनात वाहून घेतले.
संशोधनाचे क्षेत्र-रसायनशास्त्र
संशोधनाचा विशिष्ट विषय- सॉलिड स्टेट केमिस्ट्री, मटेरियल सायन्स.

संगणकाचा तिटकारा
रसायनशास्त्रज्ञ असलेल्या सीएनआर राव यांना संगणकाचा तिटकारा आहे. त्यांनी त्यांच्या टेबलावरील सर्व संगणक काढून टाकले आहेत. कारण त्यामुळे लक्ष विचलित होते असे ते म्हणातात. ते आता कुठल्याही इमेलला स्वत: उत्तरे देत नाहीत. ते मोबाइल फोनही वापरत नाहीत. फक्त पत्नी इंदू हिच्याशी बोलताना आपण मोबाईल वापरतो असे ते सांगतात.
त्यांनी बालपणीच्या आठवणी सांगताना म्हटले आहे की, एकदा नोबेल विजेते भारतीय वैज्ञानिक सी.व्ही.रमण आमच्या शाळेत आले होते. त्यांची प्रयोगशाळा पाहण्याचे भाग्यही आम्हाला लाभले होते. त्यांच्यामुळे तर विज्ञानाची प्रेरणा मिळालीच पण पुढे बनारस हिंदू विद्यापीठात कोऱ्या कागदावर अर्ज केला असताना एस एस जोशी यांनी आपल्याला तार करून बोलावून घेतले व एमएस्सीला प्रवेश दिला, त्यांच्यामुळे आपण विज्ञान क्षेत्राकडे वळलो असेही ते म्हणाले.
साधा माणूस
आपल्या बुद्धीने अधिकाधिक प्रगल्भ होत जाणारी आणि आपल्या कामात अधिकाधिक रमणारी माणसे खरोखरच साधी असतात. अशा व्यक्तींनाच त्यांचा खरा सन्मान मिळत असतो. डॉ. राव आणि सचिन तेंडुलकर यांना एकाच दिवशी भारतरत्न जाहीर झाला ही बाब खरोखरच अधोरेखित करण्यासारखी आहे. कारण ही दोन्ही माणसे आपापल्या क्षेत्रांत साधी, प्रसिद्धीपराङ्मुख, चिकाटी आणि सातत्य दाखवणारी आहेत. मी आयआयटी कानपूरमध्ये शिकत असताना डॉ. राव हे आम्हाला शिकवण्यासाठी येत असत. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी माझी आणि त्यांची भेट झाली.  त्या वेळेस ते म्हणाले की, तू एनसीएल जॉइन कर आणि त्यांची चिठ्ठी घेऊन मी एनसीएलमध्ये रुजू झालो आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.  
डॉ. एस. शिवराम, माजी संचालक, एनसीएल.

विज्ञानाचा सन्मान
प्राध्यापक सी.एन.आर. राव यांना भारतरत्न जाहीर झाल्यामुळे विज्ञानाला एक नवी झळाळी मिळाली आहे. डॉ. सी. व्ही. रामन यांच्यानंतर मूलभूत विज्ञानातील संशोधनासाठी प्रथमच भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला आहे. विज्ञान क्षेत्रातीलविद्यार्थ्यांना आदर्शवत असे काम डॉ. राव करीत असून त्यांच्या या सन्मानामुळे येत्या काळात अधिक संशोधन होऊ शकेल.
डॉ. गणपती यादव, कुलगुरू,     इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल     टेक्नॉलॉजी

प्रयोगशाळेत रमणारे मास्तर
एखाद्या संस्थेचे संचालक झाले की बराचसा वेळ इतर कामांमध्ये जातो, मग संशोधनासाठी वेळ कुठून आणायचा, अशी अनेकांची मानसिकता असते. पण डॉ. राव याला अपवाद होते. मी त्यांना भेटण्यासाठी एकदा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसमध्ये गेलो होतो, त्या वेळेस मी बराच वेळ त्यांची वाट पाहत होतो. ते परतल्यावर कळले की ते प्रयोगशाळेत होते.  
डॉ. मुस्तनसीर बर्मा, संचालक,     टीआयएफआर

आता प्रतीक्षा नोबेलची
डॉ. राव यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे विज्ञान क्षेत्रासाठी ही प्रचंड अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. वयाच्या ८०व्या वर्षीही ते प्रयोगशाळेत जाऊन काम करतात. वर्षांला त्यांचे ३० ते ४० शोधनिबंध आणि काही पुस्तके प्रकाशित होतात. अशा माणसाला आता भारतरत्न मिळाले असून हा खरोखरच तमाम भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ वैज्ञानिक.