बार्सिलोना येथून झेपावलेल्या जर्मनविंग्ज विमानाच्या अपघाताचे कारण आता स्पष्ट होऊ लागले आहे. १५० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला हा अपघात सहवैमानिकामुळेच झाल्याचे आढळून आले आहे. आंद्रे लुबित्झ असे या सहवैमानिकाचे नाव आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासयंत्रणांच्या हाती लागला असून त्यातील तांत्रिक माहितीच्या आधारेच लुबित्झ यानेच विमान पाडल्याचे स्पष्ट होत आहे. बार्सिलोनाहून जर्मनीतील डुसेलडर्फ या शहराकडे झेपावलेले जर्मनविंग्जचे एअरबस ए३२० हे विमान मंगळवारी फ्रान्सच्या हद्दीतील आल्प्स पर्वतात कोसळले. या अपघातात १५० जण ठार झाले होते. पर्वतराजीत कोसळलेल्या या विमानाचे अवशेष तपासयंत्रणांच्या हाती लागले असून ब्लॅक बॉक्स शोधण्यातही त्यांना यश आले आहे. त्यातूनच लुबित्झ यानेच हेतुत विमान पाडल्याचे निदर्शनास येत आहे.
नियम काय सांगतो?
अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर कॉकपीटमधील नियम अत्यंत कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार विमान उड्डाणानंतर मुख्य वैमानिक अथवा सहवैमानिक यांच्यापैकी कोणीही स्वच्छतागृहात जाण्यासाठी अथवा चहापानासाठी कॉकपीटमधून बाहेर पडल्यास त्याच्या जागी हवाई कर्मचाऱ्यांपैकी एकाने कॉकपीटमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. युरोपीय हवाईसेवांमध्ये हा नियम लागू आहे किंवा कसे याबाबत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे जर्मनविंग्जच्या अपघाता वेळी कॉकपिटात सहवैमानिकाबरोबर अन्य कोणी उपस्थित होते का, याचा पत्ता लागू शकलेला नाही.

हा अपघात जाणूनबुजून घडवण्यात आला आहे. सहवैमानिकाला विमान नष्टच करायचे होते. मुख्य वैमानिक स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्याने कॉकपीटचे दार आतून लावून घेत विमान जोमाने खाली येईल, अशी यंत्रणा कार्यान्वित केली होती.
– ब्राइस रॉबिन, फ्रेंच सरकारी वकील

कोण होता लुबित्झ?
माँटाबोर या गावातीलरहिवासी असलेल्या लुबित्झने लहान वयातच ग्लायडिंगचे प्रशिक्षण घेतले होते. त्यात त्याला पक्का परवानाही प्राप्त झाला होता. त्यानंतर तो लुफ्तान्सा एअरलाइन्समध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक म्हणून रुजू झाला. कठोर प्रशिक्षणानंतर लुबित्झ जर्मनिवग्जमध्ये दाखल झाला. त्याच्याकडे एकूण ६३० हवाईतास उड्डाणाचा अनुभव होता. लुबित्झ शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाचा होता, असे त्याच्या मित्रांनी स्पष्ट केले.
लुफ्तान्सा एअरलाइन्सनेही लुबित्झच्या वागण्या-बोलण्यात अलीकडे काही लक्षणीय बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वैमानिकांची निवड करताना कठोर परीक्षा घेतल्या जातात. वैमानिकांची वेळोवेळी मानसिक व शारीरिक आणि वैद्यकीय तपासणी केली जात असल्याचेही लुफ्तान्सातर्फे सांगण्यात आले. मात्र, जर्मनविंग्जचा अपघात आपल्यासाठी खूप मोठा धडा असल्याचे लुफ्तान्साने म्हटले आहे. मुख्य वैमानिक पॅट्रिक सॉडेनहायमर हेही आदरणीय व्यक्तिमत्व होते व त्यांच्याकडे एकूण सहा हजार हवाईतासांच्या उड्डाणांचा अनुभव होता, असे लुफ्तान्साने स्पष्ट केले आहे.

वैमानिकांनी विमान पाडल्याच्या घटना –
२९ नोव्हें. २०१३ : मोझांबिक आणि अंगोला यांदरम्यान उड्डाण करीत असलेल्या विमान नामिबियात कोसळले. ३३ प्रवासी मृत्युमुखी. सहवैमानिक कॉकपीट बाहेर पडताच मुख्य वैमानिकाने हा अपघात जाणूनबुजून घडवून आणल्याचा प्राथमिक तपास अहवाल.
३१ ऑक्टो. १९९९ : न्यू यॉर्कहून उड्डाण घेतल्यानंतर अध्र्याच तासात इजिप्तएअरचे बोईंग ७६७ विमान कोसळले. २१७ प्रवासी ठार. हा अपघात सहवैमानिकाने घडविल्याचा अंदाज.
१९ डिसें. १९९७ : इंडोनेशियाहून सिंगापूरला निघालेले बोईंग ७३७ कोसळले. ११० हून अधिक प्रवासी मृत्युमुखी. ‘कामाशी निगडीत विविध समस्यांनी बेजार’ असलेल्या वैमानिकाने आधी फ्लाईट रेकॉर्डर बंद केले व मग विमान कोसळविले.
(स्त्रोत : एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क)

नेमके काय झाले?
*बार्सिलोनातून विमान झेपावल्यानंतर थोडय़ाच वेळात विमानाने फ्रान्सच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला.
*थोडय़ा वेळाने मुख्य वैमानिकाने स्वच्छतागृहात जाण्यासाठी विमानाचे नियंत्रण लुबित्झ याच्याकडे सोपवले.
*मुख्य वैमानिक जाताच लुबित्झने कॉकपीटचे दार घट्ट बंद करून विमान वेगाने खाली येईल अशी यंत्रणा सुरू केली.
*३८ हजार फूट उंचीवरून प्रवास करणारे विमान झपाटय़ाने खाली आले.
*मुख्य वैमानिकाने तातडीने कॉकपीटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून दार बंद असल्याने त्याचा नाईलाज झाला.
*मुख्य वैमानिकाने दारावर धडका मारून कॉकपीटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही.
*अवघ्या काही मिनिटांतच विमान आल्प्स पर्वतराजीत कोसळले.
*अखेरच्या क्षणापर्यंत लुबित्झ जिवंत होता.

dv09*लुबित्झच्या मोंटेबौर येथील निवासस्थानी माध्यमांच्या प्रतिनिधींना रोखण्यास सुरक्षारक्षक तैनात होते.