पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोईम्बतूरमध्ये ११२ फुटांच्या शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले आहे. ईशा फाऊंडेशनने तमिळनाडूत शंकराच्या भव्य मूर्तीची निर्मिती केली आहे. महाशिवरात्री निमित्ताने पंतप्रधान मोदींनी शंकराच्या मूर्तीचे अनावरण केले. ईशा फाऊंडेशनकडून लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या मूर्ती उभारण्यात येणार आहेत. भगवान शंकराच्या भव्यदिव्य मूर्तीचे अनावरण करताना पंतप्रधान मोदींनी योग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

‘योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग करण्यामुळे जग एकत्र आले आहे. सध्या संपूर्ण जगाला शांततेची आवश्यकता आहे. जगाला युद्ध आणि वाद नको आहेत. सर्व जगाला यापासून मुक्तता हवी आहे. यामध्ये योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मात्र फक्त प्राचिन असल्याने योग नाकारणे योग्य होणार नाही,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

शंकराच्या मूर्तीच्या अनावरणाप्रसंगी ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी यांनी देशाच्या उत्तरेला, पूर्वेला आणि पश्चिमेला अशाच प्रकारच्या मूर्ती उभारणार असल्याची माहिती दिली. वाराणसी, मुंबई आणि दिल्लीच्या उत्तरेला मूर्ती उभारणार असल्याचे सद्गुरु जग्गी यांनी सांगितले. कोईम्बतूरमधील शंकराची मूर्तीचे डिझाईन तयार करण्यात अडीच वर्षांचा कालावधी लागला आहे. आठ महिन्यांमध्ये या मूर्तीची उभारणी करण्यात आली. भगवान शंकराचा चेहरा स्टिलच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन तब्बल ५०० टन इतके आहे.