संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून राजधानी दिल्लीत पारा १.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. थंडीची ही लाट आणखी दोन दिवस राहील असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. थंडीच्या बळींमध्ये रविवारी आणखी २३ जणांची भर पडली असून आतापर्यंत बळींचा आकडा १६० वर पोहोचला आहे.
उत्तर भारतात थंडीने कहर केला आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे तर पारा शून्याच्याही खाली घसरला असून राजधानी दिल्लीत १.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा हा यंदाचा नीचांक समजला जात आहे. राजधानीत सोमवारी धुक्याचे साम्राज्य असेल असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
थंडीचा कडाका सर्वात जास्त उत्तर प्रदेशला जाणवत असून आतापर्यंत येथेच सर्वाधिक बळींची नोंद झाली आहे. थंडीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आणखी १५ जणांची भर पडली आहे. बिजनोर, इटा आणि मुझफ्फरनगर येथे प्रत्येकी तीन जण तर ललितपूर आणि मिर्झापूर येथे प्रत्येकी दोघांचा बळी गेला आहे. उन्नाओ आणि चंडौली जिल्ह्य़ांत थंडीने प्रत्येकी एकाचा बळी घेतला आहे.
पंजाब आणि हरयाणातही थंडीचा कडाका कमालीचा वाढला असून अमृतसर येथे चारजणांचा बळी गेला आहे. हरयाणातील हिसार आणि नरनौल येथे प्रत्येकी एकजण थंडीमुळे दगावल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हिसार येथे पारा १.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून हरयाणातील हा विक्रमी नीचांक आहे.  
राजस्थानातील चुरू या थंड हवेच्या ठिकाणीही तापमानाने २.२ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. माऊंट अबू येथे तर शून्याच्याही खाली पारा गेला आहे