कारगिल जिल्ह्य़ात उणे १०.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून काश्मीरमध्ये थंडीची लाट वेगवेगळ्या भागात कायम आहे.
लेह येथे उणे ९.४ अंश तापमानाची नोंद झाली असून कारगिल शहरानजीकचे तापमान उणे १०.२ अंश होते. राज्यात सर्वात कमी तापमान तिथे नोंदले गेले असे हवामान खात्याच्या प्रवक्तयाने सांगितले.
श्रीनगर ही जम्मू-काश्मीरची उन्हाळी राजधानी असून तिथे  ०.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. शहरात रात्रीचे तापमान प्रथमच गोठणबिंदूच्या वर होते. काश्मीर खोरे व लडाख भागातील तापमान शून्याच्या खाली गेले आहे.
गेल्या काही आठवडय़ात शून्यापेक्षा कमी तापमान श्रीनगरला नोंदले गेले, तेथे रात्री काही आठवडे उणे २.२ अंश तापमान होते. गुरूवारी हंगामातील नीचांकी म्हणजे ४.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. किमान तापमान अनेक ठिकाणी गोठणबिंदूच्या खाली असून काश्मीरचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंड येथे तापमान उणे २.४ सेल्सियस होते, तर दक्षिण काश्मीरमध्ये किमान तापमान उणे ०.२ अंश होते. अमरनाथ यात्रेसाठीचे पर्यटक केंद्र असलेल्या पहलगाम येथे व गुलमर्ग येथे उणे ३ अंश सेल्सियस तापमान होते. उत्तर काश्मीर येथे उणे ३.१ अंश तापमान होते. राज्यात हलका पाऊस व हिमवृष्टीची शक्यता आहे.