केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून नोटाबंदीचा निर्णय घेतला असला, तरी त्याच्या अंमलबजावणी त्रुटी असल्याचे समोर आले आहे. निर्णयाला महिन्याचा कालावधी होत आला असला, तरी अद्याप बॅंकांसमोर लोकांच्या लांबच लांब रांगा असल्याचे दिसत आहे. याच नोटाबंदीच्या निर्णयाची आणि चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरू होण्या अगोदर राष्ट्रगीत लावण्याच्या सक्तीची अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये आक्षेपार्ह पद्धतीने खिल्ली उडविण्यात आली आहे. THE DAILY SHOW WITH TREVOR NOAH या कार्यक्रमात या दोन्ही निर्णयांचा आक्षेपार्ह पद्धतीने खिल्ली उडविण्यात आली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने या दोन्ही निर्णयांवर कार्यक्रमात टीका केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीतासोबतच अमेरिकेतील राष्ट्रगीताचीही खिल्ली उडविण्यात आल्याचे दिसून आले. एक डिसेंबरला हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला होता. कार्यक्रमात वापरण्यात आलेल्या ग्राफीक्समध्ये भारताचा नकाशाही चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आला होता. त्यावरूनही वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.भारतात चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्याचा मुद्दा कितपत लांबेल, याची कल्पना नाही. चित्रपटगृहांनंतर आता किराणा दुकानांमध्येही राष्ट्रगीताची सक्ती केली जाऊ शकते, अशी आक्षेपार्ह टिप्पणी सूत्रसंचालकाने केली. एखादी व्यक्ती अडचणीत सापडली असेल आणि तिने अग्निशामक दलाला पाचारण केले तर तिला असेही सांगण्यात येऊ शकते की अग्निशामक दलाचे जवान येथून निघत आहेत. पण त्यापूर्वी जन गण मन होईल, अशी टिप्पणीही सूत्रसंचालकाने केली. हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्यावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. अशा पद्धतीने राष्ट्रगीतावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्यामुळे अनेकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.