धर्माधतेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय वातावरण अत्यंत प्रक्षुब्ध झाले आहे. भारताच्या सभोवतालीही त्याचे लोण पसरले आहे. मात्र अशा प्रक्षोभकतेवर विश्वास ठेवणाऱ्यांना अजूनही भारताची मूल्येही कळलेली नाहीत आणि भारतीय राजकारणाची नसही त्यांना समजलेली नाही, असे खडे बोल भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सुनावले. धर्माधता, असहिष्णुता आणि हिंसा हा लोकशाहीशी द्रोहच असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रास उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी वाढत्या जातीय हिंसाचाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख आपल्या भाषणात त्यांनी केला. औरंगजेबाने झिजिया कर लादल्यानंतर महाराजांनी हे पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी औरंगजेबाला त्याच्या पूर्वजांची आठवण करून दिली होती. शहाजहान, जहांगीर आणि अकबर हेही असा झिजिया कर लादू शकले असते, मात्र त्यांनी धर्माधतेला थारा दिला नाही, असा उल्लेख महाराजांनी पत्रात केला. हा शिवाजी महाराजांचा वैश्विक संदेशच आपल्या मार्गक्रमणासाठी प्रकाश देणारा आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.
शांत आमि विचारी अंत:करणाने समस्येवर तोडगा काढण्याची सवयच आपण गमावत चाललो आहोत का? आपली लोकशाहीच कलकलाटाची होते आहे का, असे प्रश्न राष्ट्रपतींनी मांडले.