हिंदू दहशतवादाबाबत वक्तव्य केल्यावरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध प्राथमिक तक्रार नोंदविण्याबाबत काय कारवाई झाली, याबाबत महानगर दंडाधिकारी विप्लव डब्बास यांनी दिल्ली पोलिसांना शुक्रवारी विचारणा केली.
शिंदे यांचे वक्तव्य हे राष्ट्रीय एकात्मतेला तडा देणारे तसेच हिंदू धर्म आणि श्रद्धांचा अवमान करीत व अपप्रचार करीत त्यांच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्राथमिक तक्रार नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी याचिकेद्वारे केली आहे. शिंदे यांचे वक्तव्य धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारे आणि धार्मिक दंगलींना फूस देणारे आहे, असाही गर्ग यांचा आरोप आहे.
गर्ग यांचे वकील अ‍ॅड. अजय गोयल म्हणाले की, शिंदे यांनी हे विधान जाणीवपूर्वक व वाईट हेतूने केले असून जगभरातील लोकांनी इंटरनेटद्वारेही ते वाचले आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या प्रतिमेला धक्का दिला गेला आहे. लष्कर ए तयबाचा संस्थापक हाफिज़्‍ा सईद याच्यासारख्या अतिरेक्यांनाच या विधानामुळे बळ मिळाले आहे, याकडेही अ‍ॅड. गोयल यांनी लक्ष वेधले.
देशाचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या व्यक्तिवर देशाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असताना त्यांनी निव्वळ मतांसाठी हीन पातळीचे लांगूलचालन केले आहे, असा आरोपही याचिकादारांच्यावतीने करण्यात आला.