झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने आघाडीचा मार्ग चोखाळून काही अपक्षांना हाताशी धरल्याने झारखंडमधील सत्तास्थापनेचा संघर्ष उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचला आहे. शनिवारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल सय्यद अहमद यांची भेट घेऊन झारखंडमधील सरकार स्थापनेसाठी अधिक कालावधी द्यावा, अशी मागणी केल्याने अपक्षांना हाताशी धरून हे तीन पक्ष सत्तेची मोट बांधणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार असल्याचे पाटणा येथे घोषित केले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन, त्यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी सय्यद अहमद यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनीही अहमद यांची भेट घेतली. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रत्येक पर्याय खुला आहे. आम्ही राज्यपालांकडे मुदत मागितली आहे, किती मुदत द्यावयाची हा त्यांचा अधिकार आहे, असे हेमंत सोरेन म्हणाले. हेमंत सोरेन हे दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन परतले आहेत. मात्र त्यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली नाही.
झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाशी युती केल्यास पक्षाच्या प्रतिमेला बाधा येईल, असा काँग्रेसमध्ये प्रथम मतप्रवाह होता. मात्र आता त्यामध्ये बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा हा मोठा पक्ष आहे. कोणत्याही आमदाराला राज्यात राष्ट्रपती राजवट नको आहे. विधानसभेची मुदत संपुष्टात येण्यास अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करीत आहोत, असे काँग्रेसचे नेते राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले. राष्ट्रीय जनता दलाचे पाच आमदार असून ते झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीत सहभागी होण्यास तयार आहेत. त्यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपकुमार बालमुचू यांनी सांगितले की, केंद्रातील नेत्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे. स्थानिक पातळीवरील स्थितीची कल्पना दिल्यानंतर केंद्रीय नेत्यांचे समाधान झाले आहे. त्यामुळे लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. प्रथम आम्ही सरकार स्थापनेसाठी उत्सुक नव्हतो. मात्र झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आल्याने आम्ही चर्चेला तयार झालो आहोत, असे रांचीचे खासदार सुबोधकांत सहाय म्हणाले. तथापि, काँग्रेसच्या चिंतन शिबिरात त्यावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतील, असेही सहाय म्हणाले.