देशासाठी लढताना वीरगती मिळविलेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या इंडिया गेटच्या प्रशस्त व प्रतिष्ठित परिसरात ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ उभारण्याबाबत काँग्रेस पक्षातच रण माजले आहे. स्मारक उभारण्याचा निर्णय मंत्रीगटाने घेतला असून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मात्र फेरफटका मारण्याची आवडती जागा दिल्लीकरांना गमवावी लागेल, हे कारण पुढे करीत त्याला विरोध दर्शविला आहे. केंद्रीय नगर विकास खात्यानेही या शिफारशीविरोधातच मत नोंदविले आहे.
संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाने ऑगस्टमध्ये इंडिया गेटजवळील प्रिन्सेस पार्कच्या आवारात ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ उभारण्याची शिफारस केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाला त्याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा आहे. त्याआधीच मुख्यमंत्री दीक्षित यांनी अँटनी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय नगरविकासमंत्री कमल नाथ यांना स्वतंत्र पत्र पाठवून स्मारकासाठी राजधानीतच अन्यत्र जागा शोधावी, अशी मागणी केली आहे. या स्मारकामुळे या परिसराचा माहोल बदलेल तसेच सुरक्षेच्या कारणामुळे बराचसा भाग हा र्निबधितही होईल आणि सकाळ-सायंकाळ फेरफटका मारण्याची एक चांगली जागा त्यामुळे दिल्लीकर गमावतील, असे मत त्यांनी दोन दिवसांपूर्वी पाठविलेल्या या पत्रात मांडले आहे.
पाकिस्तान आणि चीनशी झालेली युद्धे, दहशतवादविरोधी लढे तसेच जम्मू आणि काश्मीरमधील कारवायांत ज्या जवानांना हौतात्म्य आले त्यांना मानवंदना म्हणून दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारण्याची सेनादलांची जुनी मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन तिच्यावर विचार करण्यासाठी २००९ मध्ये मंत्रीगट स्थापला गेला होता. इंडिया गेटजवळ पहिल्या महायुद्धातील वीरजवानांचे स्मारक आहेच. त्यामुळे तेथे जवळच हे स्मारक उभारावे, असा संरक्षण मंत्रालयाची इच्छा असून आता मंत्रीगटानेही तशीच शिफारस केली आहे.
या स्मारकामुळे इंडिया गेटचे बाह्य़रूपही पालटेल आणि इथला माहोलही बदलेल, असा आक्षेप नोंदवित केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने तसेच दिल्ली नागरी कला आयोगानेही या स्मारकाला विरोध केला आहे.
अँटनी ठाम
राष्ट्रीय हुतात्मा स्मारकासाठी इंडिया गेट हीच योग्य जागा आहे, यावर संरक्षणमंत्री अँटनी मात्र ठाम आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित यांच्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी त्यांनी याच जागेवर आपली मोहोर पुन्हा उमटवली. १९७१ च्या युद्धातील हुतात्मा जवानांना अमरजवान ज्योती येथे पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सेनादलांच्या मागणीवर तीन वर्षांनंतर प्रथमच मंत्रीगटाचे एकमत झाले आहे त्यामुळे यात आणखी मोडता घातला जाऊ नये, असेही ते म्हणाले.