ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज्यसभेत गुरूवारी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसला. यावेळी काँग्रेसने भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर चौफेर टीका केली. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) असणाऱ्या गोपनीय कागदपत्रांमधील माहिती स्वामी यांना कशी मिळाली?, असा सवाल यावेळी काँग्रेसने उपस्थित केला. याशिवाय, स्वामी यांनी आत्तापर्यंत ज्या कागदपत्रांच्या जोरावर सभागृहात आरोप केले होते त्यांची सत्यता पडताळण्यात आली होती, असा सवालही काँग्रेसच्या विचारला.
सभागृहातील सन्मानीय सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांना ऑगस्टा वेस्टलँडच्या संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्रांतील माहिती कशी काय मिळाली? स्वामींनी ही कागदपत्रे सभागृहात सादर करण्यास नकार दिला होता, असे शर्मा यांनी सांगितले. मात्र, स्वामी या कागदपत्रांच्या सत्यतेची साक्षता न पटवल्यास किंवा कागदपत्रे सभागृहात सादर न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल, अशी माहिती राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन यांनी दिली.