निवडणूक आयोगाकडून गुरुवारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम एकत्र जाहीर न केल्यावरुन काँग्रेसने सवाल उपस्थित केले आहेत. तसेच निवडणूक आयोगावर मोदी सरकारने दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन सरकारवर हे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १६ तारखेला नियोजित गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींना आपल्या राज्यात खोट्या घोषणांचा पाऊस पाडता यावा यासाठीच ही खेळी खेळण्यात आली आहे. गुजरातचा निवडणूक कार्यक्रम आज घोषित केला असता तर राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागू झाला असती आणि मोदींना या घोषणा करता आल्या नसत्या. त्यामुळेच निवडणूक आयोगावर दबाव आणून निवडणुकांची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे.

सुरजेवाला ट्विटरवरील व्हिडीओत पुढे म्हणतात की, पंतप्रधानांनी निवडणूक आयोगावर दबाव टाकून आज निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यापासून रोखले आहे. मोदींनी गेल्या २२ वर्षांत ज्या अश्वासनांची पूर्तता केलेली नाही, अगदी तशाच घोषणा ते आपल्या या दौऱ्यात देणार आहेत.

भाजपला गुजरामध्ये हारण्याची भीती वाटत असल्यानेच ते आता शेवटच्या टप्प्यात मतदारांना आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशात नोव्हेंबरमध्येच निवडणूका घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. लोकांचीही हीच इच्छा असून त्यांनी भाजपला हारवण्याचा निश्चय केल्याचा दावाही त्यांनी केला.