देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांसदर्भातील विकीपीडियावरील माहिती बदलून खोडसाळ माहिती प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने बुधवारी केला. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर निशाणा साधला.
विकीपीडियावरील पेजवर पंडीत नेहरू, त्यांचे वडील मोतीलाल नेहरू आणि आजोबा गंगाधर यांच्याविषयीची माहिती केंद्र सरकारने हॅकरच्या माध्यमातून बदलली, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. या बदलाच्या माध्यमातून नेहरू परिवार मुसलमान असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसने यासाठी एनआयसीला जबाबदार ठरविले आहे.
एनआयसीच्या कार्यालयातील आयपी अॅड्रेसवरूनच नेहरू कुटुंबीयांबद्दलची माहिती बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. सरकारच्या सांगण्यावरूनच हा खोडसाळपणा करण्यात आल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेची माफी मागणार का, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.