सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस हाफिज सईदसारख्या दहशतवाद्याचीही मदत घेईल, अशी टीका गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली आहे. ‘दहशतवादी हाफिज सईदच्या मदतीने गुजरात विधानसभा निवडणूक जिंकू, असे काँग्रेसला वाटल्यास ते त्याच्याशीही हातमिळवणी करायला मागेपुढे पाहणार नाहीत,’ असे पटेल यांनी म्हटले. काँग्रेसकडून जातीय राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘पाकिस्तानमधील दहशतवादी हाफिज सईदच्या मदतीने गुजरात विधानसभा निवडणूक जिंकू, असे वाटल्यास काँग्रेसकडून त्याचीही मदत घेतली जाईल. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस त्याही थराला जाईल. यासाठी काँग्रेसकडून हाफिज सईदला निमंत्रण दिले जाईल आणि हे करताना काँग्रेसला काहीही अयोग्य वाटणार नाही,’ अशा शब्दांमध्ये गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्या भेटीच्या चर्चेबद्दल बोलताना नितीन पटेल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांची एका हॉटेलमध्ये चर्चा झाल्याची चर्चा गुजरातमध्ये आहे. मात्र अशी कोणताही भेट झाली नसल्याचे हार्दिक पटेलने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसकडून जातीयवादी राजकारण केले जात असल्याचा आरोपही नितीन पटेल यांनी केला. १९८० मधील खाम समीकरण (क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम) काँग्रेसकडून पुन्हा वापरले जात असल्याचे पटेल यांनी म्हटले. ‘सत्तेसाठी काँग्रेसकडून गुजरातला विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप ‘सब का साथ सब का विकास’ची भाषा करत असताना काँग्रेसकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. इंग्रजांप्रमाणेच फोडा आणि राज्य करा, अशी व्यूहनिती काँग्रेसकडून वापरली जात आहे. त्यामुळेच पक्षाची पाळेमुळे इतकी घट्ट असूनही काँग्रेसच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास राहिलेला नाही,’ असेही ते म्हणाले.