निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक नियम आखण्यात येतात. मात्र तरीही उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे काँग्रेसच्या एका उमेदवाराने रॅली दरम्यान आचारसंहितेच्या नियमांची एैशीतैशी केली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रदिप माथूर यांनी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दुचाकीस्वारांना १००-१०० रुपये आणि खाद्यपदार्थाचे पाकिट दिले आहे. विशेष म्हणजे ‘देवाचा प्रसाद’ म्हणून प्रदिप माथूर यांनी कूपनच्या स्वरुपात १००-१०० रुपये दिले आहेत.

निवडणूक नियमानुसार पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असताना जवळपास सर्वांचे उमेदवार या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत. मथुरेचे काँग्रेस उमेदवार प्रदिप माथूर यांनी एका रॅलीमध्ये आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसवले आहेत. रॅलीमध्ये सामील झालेल्या दुचाकीस्वारांना प्रदिप माथूर यांनी पेट्रोल भरण्यासाठी १००-१०० रुपयांचे कूपन्स दिले.

पेट्रोलचे पैस कुपनच्या माध्यमातून देण्यासाठी प्रदिप माथूर यांनी ‘देवाच्या प्रसादा’चा आधार घेतला. प्रदिप माथूर यांनी वाटलेल्या कुपनवर ‘प्रसाद’ असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांमुळे प्रदिप माथूर यांची लबाडी सर्वांसमोर आली. प्रदिप माथूर यांच्याकडून घेतलेली कूपन्स घेऊन शेकडो दुचाकीस्वार जवळच्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर गेले. याठिकाणी दुचाकीस्वार कूपन देऊन पेट्रोल भरत असताना तेथे उपस्थित असलेल्या काहींनी त्यांच्याकडे या कूपनबद्दल विचारणा केली. तेव्हा दुचाकीस्वारांनी त्यांना ‘आमदार साहेबांनी पेट्रोलसाठी कूपन दिले आहेत,’ असे उत्तर दिले. त्यामुळे प्रदिप माथूर यांनी केलेले आचारसंहितेचे उल्लंघन सर्वांसमोर आले.

याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशी आणि तपासात समोर आल्यास निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार कारवाई करण्यात येईल,’ असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.