पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने काँग्रेस नेते शशी थरूर यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झाली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या नवरत्नांमध्ये थरूर यांचा समावेश होता. ‘नवरत्न’ होण्याचे मान्य करून थरूर यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावर केरळ काँग्रेसने थरूर यांची तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केली होती. त्यावर निर्णय देत अखिल भारतीय काँग्रेस शिस्तभंग समितीने थरूर यांना पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा केली.
केरळ प्रदेश काँग्रेसने थरूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाच्या शिस्त समितीकडे केली होती. त्याची दखल घेत थरूर यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात आल्याची घोषणा सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी केली.  तिरुवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून थरूर यांना विजयी करण्यासाठी आम्ही जिवाचे रान केले; परंतु थरूर यांनी मोदींची स्तुती करून आमच्या भावना दुखावल्या असल्याचे केरळ प्रदेश काँग्रेस समितीने तक्रारीत म्हटल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. या तक्रारीवर थरूर यांनी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली होती. केरळ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मी मोदींविषयी काय लिहिले यावरील चर्चा ऐकण्याऐवजी प्रत्यक्षात माझा ब्लॉग वाचावा, असे प्रत्युत्तर थरूर यांनी दिले होते. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या संतापात अजूनच भर पडली .

थरूर यांच्या हकालपट्टीमुळे कोणत्याही परिस्थितीत मोदींची स्तुती चालणार नसल्याचा संदेश हायकमांडने नेत्या-कार्यकर्त्यांना दिला आहे. थरूर हे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनीच मोदींची स्तुती केल्याने पक्षातून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

प्रवक्तेपदावरून हटवण्यात आल्यानंतर थरूर म्हणाले की, हा पक्षनेतृत्वाचा निर्णय आहे. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून हा निर्णय मला मान्य आहे.