सरदार सरोवर प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण व्हायला ५६ वर्षे लागल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. या सगळ्या सोहळ्यानंतर काँग्रेसने काही प्रतिक्रिया दिली नसती तरच नवल वाटले असते. सोमवारी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ‘ट्विटर हँडल’ने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशा प्रकारे नावं बदलून आपल्या म्हणून दाखवल्या हे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सरदार सरोवर प्रकल्पाचा एक बॉक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देत आहेत आणि हा प्रकल्पही आपल्या सरकारचा झाला असे म्हणत आहेत, अशा आशयाचे हे व्यंगचित्र आहे. ‘बुलेट ट्रेन योजना’, ‘निर्मल भारत अभियाना’चे ‘स्वच्छ भारत अभियान’ असे बदललेले नाव, ‘नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी’चे नामकरण ‘मेक इन इंडिया’ असे बॉक्सही या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहेत.

#JanKiBaat हा हॅशटॅगही या बातमीत देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीएच्या काळातील योजनांचे नामकरण करून फक्त श्रेय घेतले असाच आरोप या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर एका व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात कोणकोणते घोटाळे झाले, याचीही यादी काँग्रेसने ट्विटर हँडलवर जारी केली आहे.

या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्रातील चिक्की घोटाळा, तर देशातील बनावट चलन घोटाळा, खाण घोटाळा, प्रवेश घोटाळा, नीट परीक्षांचा घोळ यांसह अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच विजय मल्ल्याही तुमच्याच कारकिर्दीत कर्ज बुडवून पळाला असल्याचा उल्लेख या व्हिडिओत करण्यात आला आहे.