गुजरात दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी आपल्या अमेठी मतदारसंघाचा काहीच विकास केला नसल्याचा आरोप करत भाजपने येथील विकासकामे सुरू केल्यामुळे काँग्रेस पक्ष गोंधळला असल्याचा टोला लगावला. अमित शहा गुजरातला येतात. पण राहुल गांधी हे इटलीला पळून जातात. तेव्हा त्यांना गुजरातची आठवण येत नाही. जिथे जिथे राहुल गांधी प्रचार करायला जातात. तिथे काँग्रेसचा पराभव नक्की असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

गुजरातच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्यनाथ यांचा आज पहिला दिवस होता. वलसाड येथील सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, काँग्रेसने नेहमी देशाला लुटले आहे. मोदी सरकारने भ्रष्टाचार, काळा बाजार आणि काळ्या पैशाविरोधात कठोर पावले उचलली. ही गोष्ट काँग्रेसला पचत नाहीये, असे म्हणत राहुल गांधी विनाकारण पंतप्रधान मोदींवर का टीका करत आहेत, असा सवाल उपस्थित केला. पंतप्रधानांनी देशातील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलल्यामुळे हे होत आहे, असेही त्यांनी म्हटले.

राहुल गांधी अनेक वर्षांपासून अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. तरीही अमेठी विकासापासून कोसो दूर आहे. निवडणुकीच्या वेळीसच काँग्रेसला अमेठीची आठवण का येते ? यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारची सत्ता आल्यानंतर लगेचच आम्ही अमेठी जिल्हा मुख्यालयासाठी २१ कोटी रूपयांचा निधी दिला. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरून कधी भेदभाव करत नाही, हे यावरून दिसून येते, असे आदित्यनाथ यांनी म्हटले.

गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. भाजपला या ठिकाणी पुन्हा एकदा विजय मिळवायचा आहे. पंतप्रधान मोदींचे हे गृहराज्य आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसकडूनही येथे प्रयत्न केला जात आहे. त्याचाच भाग म्हणून राहुल गांधी यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला. यावेळी त्यांनी मोदींना लक्ष्य केले होते.