‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या लाखो समर्थकांचे ई-मेल जाहीर करून त्यांच्या सुरक्षेला धोका उत्पन्न केल्याबद्दल टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) वर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी काँग्रेसने केली.
देशात ‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या मुद्दय़ावरून सध्या वादंग माजले आहे. इंटरनेटच्या वापरावर नियंत्रणे आणण्यात सरकार कंपन्यांना धार्जिणे धोरण स्वीकारत असल्याचा नेटिझन्सकडून आरोप करण्यात येत आहे. इंटरनेटचा वापर बंधमुक्त ठेवण्यासाठी अनेक नेटिझन्सनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रायला ई-मेल पाठवून निषेध नोंदवण्यात येत आहे. या नागरिकांचे ई-मेल आयडी जाहीर करून ट्रायने त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत तडजोड केली आहे. आता हॅकर आणि  ऑनलाइन गुन्हेगार त्याचा गैरवापर करू शकतील. त्यामुळे ट्रायवर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी मंगळवारी लोकसभेत केली. तसेच केंद्र सरकारने आपण कंपन्यांच्या बाजूने आहोत की जनतेच्या हे ठरवावे, असेही त्यांनी म्हटले.