आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतात डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. हरयाणा व महाराष्ट्रात उद्या, बुधवारी विधानसभेसाठी मतदान होणार असल्याने काँग्रेसने महागाईवरून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेस प्रवक्ते अजय कुमार म्हणाले की, मोदी सत्तेत येऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. परंतु एकदाही महागाई कमी झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका, अजय कुमार यांनी ठेवला.
अजय कुमार म्हणाले की, मोदी सरकार देशवासीयांची दिशाभूल करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. भारतात मात्र काही पैशांनी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर कपात करण्यात आली. प्रत्यक्षात भारतात पेट्रोलियम पदार्थाच्या किमती सन २०१० मध्ये होत्या तितक्या कमी केल्या पाहिजेत. भारतीय तेलकंपन्या तोटय़ात असल्याचे खोटे कारण सरकारकडून पुढे करण्यात येत आहे.